महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २२ जून २०२६ रोजी सोलापूर–नागपूर महामार्गावरील पार्डी टोल नाका (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे कारवाई करण्यात आली. KA 29 B 6880 या वाहनाची तपासणी केली असता त्यामधील सुपारीचा दर्जा संशयास्पद वाटल्याने दोन अन्न नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, अरूण तम्मडवार आणि अ. नं. गिरी यांच्या पथकाने सहायक आयुक्त रा. मा. भरकड तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह आणि सर्व अन्न सेवा आस्थापनांसाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जारी केलेल्या सर्वंकष अनुपालन आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर २५ जून २०२६ रोजी नांदेड येथील हॉटेल मिंट, छत्रपती चौक येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहायक आयुक्त रा. मा. भरकड आणि सु. द. जिंतुरकर यांनी संबंधित आस्थापनांना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
