रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान

नांदेड : -डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर फिल्टर विथ कुलर दान करण्यात आला आहे.

भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हॅपी क्लब व नांदेड शांतता कमिटी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ॲड. मोहम्मद कासिम वसीम बाबुसेठ तसेच हॅपी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद शोहेब यांच्या सहकार्याने बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक ७ साठी हा वॉटर फिल्टर विथ कुलर रुग्णालयास प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, बालरोग विभागप्रमुख डॉ. किशोर राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद देवसरकर, अधिसेविका बी. आर. मुदीराज यांच्यासह कर्मचारी व रुग्णनातेवाईक उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी समाजातील दाते, सामाजिक संस्था आणि सुजाण नागरिकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट लाभ मिळत असून अधिकाधिक दाते पुढे येऊन आरोग्यसेवेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देण्यात आलेल्या साहित्याची योग्य देखभाल व व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित वॉर्डाला देण्यात आल्या. तसेच रुग्ण व नातेवाईकांनी उपलब्ध सुविधांचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमासाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने राजरत्न केळकर व कुणाल महागडे (समाजसेवा अधीक्षक) यांनी संस्थेशी समन्वय साधून अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर फिल्टर उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रुग्णालय प्रशासनाने दात्यांचे आभार मानून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!