नांदेड (प्रतिनिधी)- एटीएस काळाचौकी, मुंबई येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शुबदीपसिंग उर्फ शुभ गुरविंदरजितसिंग औलख रा. पंजाब याला नांदेड येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. एस. डी. तावशीकर यांनी हा आदेश दिला.
सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीचा मुख्य गुन्ह्यातील सहभाग prima facie पुरेशा पुराव्यांद्वारे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने आदेशात नमूद केले की, तपास यंत्रणेकडून आरोपीचा कटकारस्थानातील थेट सहभाग दर्शविणारे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत आरोपीला कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही.
न्यायालयाने आरोपीला पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि न्यायालयीन तारखांना उपस्थित राहणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे या प्रकरणात एकूण पाच मकोका आरोपीनी जामीन मागितला होता. पण न्यायालयाने एकालाच जामीन मंजूर केला आहे.इतर चार जणांचे जामीन मागणीचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. जामीन मिळालेल्या आरोपी शुबदीपसिंग उर्फ शुभ गुरविंदरजितसिंग औलख याच्यावतीने ऍड. आर.जी. परळकर आणि ऍड. अमनदीपसिंघ कामठेकर यांनी बाजू मांडली.
