हिमायतनगर (प्रतिनिधी)- हिमायतनगर पोलिसांनी अवैधरित्या गोवंशीय जनावरे बांधून ठेवणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत अंदाजे २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२५ कलम ५(ब), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार यांनी फिर्याद दिली आहे.
अवैध जनावर वाहतूक व कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुर्तुजा कॉलनी परिसरात गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने टिनाच्या शेडमध्ये बांधून ठेवण्यात आली आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता १३ गोवंशीय जनावरे अवैधरित्या बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरांची सुटका केली व अंदाजे २.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी शेख जलील शेख खाजामिया, रा. रहीम कॉलनी, हिमायतनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांच्या पथकाने केली.

