नांदेड, (प्रतिनिधी): -नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया करत तब्बल 50 लाख 97 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही मोहीम 1 ते 31 मे 2026 दरम्यान राबविण्यात येत असून, 25 व्या दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या अधिपत्याखालील पथकाने लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी महाराज चौक ते दयानंद महाविद्यालय मार्गावर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी मटका खेळविणाऱ्या व खेळणाऱ्या 11 जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून 2 लाख 57 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय परिक्षेत्रात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 3 जणांविरुद्ध कारवाई करून 27 लाख 1 हजार 250 रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. मटका-जुगार प्रकरणात 11 जणांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करून 55 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्री करणाऱ्या 16 जणांविरुद्ध 16 गुन्हे नोंदवून 27 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध 2 गुन्हे दाखल करून 15 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल, तर गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध 3 गुन्हे दाखल करून 5 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत 3 आणि कोटपा कायद्यांतर्गत 6 अशा विविध स्वरूपाच्या एकूण 38 कारवाया करण्यात आल्या. दरम्यान, नागरिकांना त्यांच्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन (9150100100) सुरू केली आहे. या हेल्पलाईनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अवैध व्यवसायांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,381 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्य शासनाने 14 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या .. आता नरेंद्र कोणाची कुर्बानी देणार ?