नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेला मोठे यश मिळत असून, मोहिमेच्या २० व्या दिवशी पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत एकूण ५६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ७३ लाख ९३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७२.०३ ग्रॅम ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत मटका-जुगार खेळणाऱ्या व चालविणाऱ्या १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ४३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या ३८ जणांविरुद्ध ३६ गुन्हे दाखल करून ४ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अवैध वाळू उपसा करणाऱ्या ३ जणांविरुद्ध २ गुन्हे दाखल करून तब्बल ५५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत २, कोटपा कायद्यान्वये २ आणि इतर विविध अधिनियमांखाली कारवाया करण्यात आल्या.
दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी माहिती नागरिकांकडून थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिक फोन अथवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती देऊ शकतात. या हेल्पलाईनला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
