नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट शिक्के आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नावाचे बनावट शिक्के तयार करून रजिस्ट्री करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरूषाविरुध्द किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोकुंदा येथील ग्राम विकास अधिकारी राजेंद्रकुमार बापूराव माळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 मार्च 2024 च्या पुर्वी कधी तरी काही जणांनी एका भुखंडाची विक्री केली. त्यानंतर त्या भुखंडाच्या मुळ मालकाने गोविंदा ता.किनवट येथील ग्राम विकास अधिकाऱ्यांना माझ्या भुखंडाची कागदपत्रे तुम्ही कशी काय दिली अशी विचारणा केल्यानंतर ग्राम विकास अधिकारी राजेंद्रकुमार बापुराव माळवे यांनी त्या कागदपत्रांची तपासणी केली तेंव्हा त्यावर असलेली स्वाक्षरी त्यांची नव्हती, ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत हा शिक्का बनावट होता. ग्राम पंचायत गोकुंदा हा शिक्का बनावट होता. त्यानंतर त्यांनी या बाबत किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
किनवट पोलीसांनी या तक्रारीवरुन आसिफ खान आयुब खान पठाण रा.सुभाषनगर किनवट, सुनिता सुभाष खंदारे रा.कनेरगाव नाका ता.हिंगोली आणि संगिता युवराज आडे रा.नारायणनगर गोकुंदा ता.किनवट या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 87/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुनिल बिरला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांच्याकडे देण्यात आला आहे.