कुलसचिवपदी डॉ. ज्ञानेश्वर पवार; उप-परिसर, लातूर संचालकपदी डॉ. शिवप्पा नागोबा तर नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालकपदी डॉ. शैलेष वाढेर नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलसचिव, संचालक उप-परिसर, लातूर तसेच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक या महत्त्वाच्या प्रशासकीय पदांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. ८ मे २०२६ रोजी कुलसचिव आणि संचालक, उप-परिसर लातूर या पदांसाठी मुलाखती पार पडल्या होत्या, तर दि. ११ मे २०२६ रोजी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक पदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर दि. १३ मे २०२६ रोजी या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची कुलसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असून, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. शैलेष जयंतीलाल वाढेर यांची नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक पदावर तर डॉ. नागोबा शिवप्पा नरसिंग यांची उप-परिसर, लातूर संचालक पदावर निवड करण्यात आली आहे. डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार हे विद्यापीठाच्या गणितशास्त्र संकुलातील ज्येष्ठ प्राध्यापक असून अध्यापन व संशोधन क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी गणितशास्त्र संकुलाचे संचालक म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद यांसारख्या विविध अधिकार मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उप-परिसर, लातूर संचालकपदी नियुक्त झालेले डॉ. नागोबा शिवप्पा नरसिंग यांना शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षांचा अनुभव आहे. ते विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन म्हणूनही कार्यरत असून विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ उप-परिसराच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय विकासासाठी होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, डॉ. शैलेष जयंतीलाल वाढेर हे विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र संकुलात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या असून विद्यापीठातील अनेक समित्यांवर प्रभावी योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठातील नवोपक्रम, संशोधन व उद्योग-साहचर्य उपक्रमांना अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विद्यापीठातील या नव्या नियुक्त्यांमुळे शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासकीय कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 867 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राहुल गांधींचे दौरे विरुद्ध मोदीजींचे विदेश दौरे करत राहा तुलना सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीरास तीन वर्षांची सक्तमजुरी