नांदेड(प्रतिनिधी)-यंदा 24 मार्च रोजी होळी, 25 मार्च रोजी धुलिवंदन आणि 26 मार्च रोजी हल्ला महल्ला असे सण अत्यंत उत्साहात साजरे झाले.
यावर्षी 24 तारखेला होळी हा सण साजरा झाला. त्यामध्ये भद्रा हा मुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी होळीचे दहन भद्रामुहूर्त संपल्यानंतर रात्री 11 वाजता करण्यात आले. पण काही ठिकाणी नेहमीच्यावेळेत सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेदरम्यान होळीचे दहन करण्यात आले. गल्लोगल्ली फाल्गुण गित गात वाजत गाजत मिरवणूका काढण्यात आल्या.
25 मार्च रोजी धुलिवंदन हा सण साजरा झाला. गटा-गटाने युवक-युवती आणि बालक फिरत होते आणि एक दुसऱ्यांना रंग लावून आनंद व्यक्त करत होते. काही युवकांनी शेतांमध्ये धुलिवंदनची पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर सायंकाळपर्यंत जवळपास बाजारपेठ बंद होती. परंतू सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान बाजारपेठेतील खाद्यपदार्थांची दुकाने आणि काही खाद्यपदार्थांचे हातगाडे दिसत होते. त्यावर सुध्दा जुंबड होती.
26 मार्च रोजी सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने दरवर्षी साजरा होणारा हल्ला महल्ला हा सण साजरा झाला. त्यात पंचांगातील वेगवेगळ्या परिस्थितीनुसार एक दिवस जास्त वाढला. पण दहम पातशाह श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचे आर्शिवाद प्राप्त करण्यासाठी देशभरातून जवळपास लाखभर यात्रेकरूंनी सचखंड श्री हजुर साहिब यांचे दर्शन घेवून आर्शिवाद प्राप्त केले. आज दुपारी 3 वाजता पंचप्यारे साहिबान यांनी अरदास करून हल्ला महल्ला मिरवणूकीला सुरूवात झाली. सचखंड श्री हजुर साहिब येथून हल्ला महल्ला मिरवणूकीची सुरूवात झाली. महाविर चौकापर्यंत सिख भाविकांनी एक दुसऱ्यांवर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. सायंकाळी 6 वाजता महाविर चौकात अरदास (प्रार्थना)झाल्यानंतर बोले सोनिहाल सतश्रीअकाल च्या जयघोषात हल्लाबोल साजरा करण्यात आला. ही मिरवणूक धावत गुरुद्वारा बावली साहब येथे पोहचली त्यानंतर ही मिरवणूक पुढे बाफना टी पाईंट, जुना मोंढा येथून परत सचखंड श्री हजुर साहिब येथे येवून समाप्त होते. वृत्त प्रसिध्द झाले तेंव्हा सुध्दा ही मिरवणूक सुरूच होती. 23 मार्च ते 26 मार्च या दरम्यान कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने भरपूर परिश्रम घेतले.