नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक मोहीम; १३५ गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून मे २०२६ महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या काही दिवसांत १३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६१ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

१ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या ११ व्या दिवशीच विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या. दिवसभरात गुटखा विक्रीप्रकरणी तीन कारवाया करण्यात आल्या असून आरोपींकडून २९ हजार ४०६ रुपयांचा गुटखा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना दहा वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते.

याशिवाय मटका व जुगार खेळविणाऱ्या तसेच खेळणाऱ्या इसमांविरुद्ध मोठी मोहीम राबविण्यात आली. एकूण ४९ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार २४ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ५ लाख १३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत ९१ इसमांविरुद्ध ९१ गुन्हे दाखल केले. या कारवाईत २ लाख ६७ हजार २०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत ४ आणि कोटा कायद्यानुसार १३ कारवाया करण्यात आल्या. विविध कारवायांमध्ये मिळून एकूण ८ लाख २२ हजार ४४६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधातील कारवाईत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याची सुविधा आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले असून पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!