पतीला विद्युत शॉक देऊन खून; पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

 

नांदेड, – दारूच्या नशेत असलेल्या पतीशी झालेल्या वादातून त्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा शॉक देऊन ठार मारणाऱ्या पत्नीला जिल्हा व सत्र न्यायालय, भोकर येथून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला ५००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्रकरणाची हकीकत अशी की, तळेगाव (ता. उमरी, जि. नांदेड) येथे १५ जून २०१९ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता मयत भिमराव नागोराव हैबते (वय ४०) हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी पत्नी आम्रपाली भिमराव हैबते (वय २९) यांच्याशी “दुसऱ्या लोकांना का बोलते?” असा वाद घातला. संतापलेल्या पत्नीने चुलीजवळ असताना पोटावर चालू विद्युत प्रवाह असलेल्या वायरने शॉक देऊन त्यांचा जीव घेतला.

 

अधिक तपासात असे उघड झाले की, आरोपीने घटनेनंतर नातेवाईकांना वेगवेगळी कारणे सांगितली – कधी ‘हार्ट अटॅक’ तर कधी ‘अपघाती वीज शॉक’. तसेच मृताच्या अंगावरील जळालेल्या खुणा लपवण्यासाठी त्याची बनियान पँटमध्ये खोसून ठेवली होती. शॉक देणारी वायरही तिने आधीपासून जोडून ठेवली होती.

 

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे आरोपीचाच १३ वर्षांचा मुलगा निलेश भिमराव हैबते होता. त्याने न्यायालयात स्पष्ट सांगितले की, घटनेनंतर आईने बाबांच्या कमरेजवळ जळालेली पँट व शर्ट बदलून बाजेखाली लपवली. हीच पँट-शर्ट बाबा दारू पिऊन आल्यावर घालत होते.

 

सरकारपक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सी. अनुराधा शिवराज डावकरे (रेड्डी) यांनी मुलाची साक्ष आणि संबंधित न्यायनिवाडे न्यायालयासमोर मांडले. पोलीस निरीक्षक उत्तम मुळे यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले. न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या खटल्यात पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी श्रीनिवास दत्ता नाईनवाड यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!