नांदेड (प्रतिनिधी)- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात (११ ते १७ एप्रिल) एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुटखा व्यवसायाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत १२ कारवाया, अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये १ कारवाई तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत ६० कारवाया केल्या. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३० लाख ६० हजार रुपयांचा गुटखा, १ लाख १२ हजार रुपयांचा गांजा तसेच ३ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, तलवारी, खंजर व अन्य घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. परभणी ग्रामीण परिसरातील गुटखा जप्ती, अर्धापूर येथे नकली जर्दा तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई तसेच लातूर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या मोठ्या जप्तीचा या मोहिमेत समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून 9150100100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना केले आहे. पोलिसांकडून ही विशेष मोहीम पुढील आठवड्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 616 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित;जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई;होलसेलर वर कार्यवाही कधी ? नांदेड पोलिसांची मोठी कारवाई : ४६.०३ लाखांचे ३०३ हरवलेले मोबाईल हस्तगत