नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक प्रक्रियेसाठी पत्रकार परिषद घेवून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने बऱ्याच बाबी सांगितल्या. या पत्रकार परिषदेनंतर आचार संहिता लागू झाली असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे आता अनेक जणांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.
लोकसभा निवडणुक आचार संहिता लागू झाली आणि त्यामुळे आता अनेक जणांना सुगीचे दिवस आले हे म्हणण्यात काही गैर नाही. ठिकठिकाणी जेवणावळी होतील. बिअर बार फुल भरून राहतील. शहराबाहेरच्या हॉटेल्समध्ये गर्दी वाढेल. बॅन्ड पथक, ध्वनीक्षेपक यांना सुध्दा भाव येईल. काही ठिकाणी डी.जे.वाजतील त्यांचीही सुगीच आहे. सर्वात मोठी सुगी अधिकारी आणि पत्रकारांची आहे. पत्रकारांमध्ये पॅकेजवर चर्चा होईल. पॅकेजमध्ये कमी जास्त करण्यासाठी मध्यस्थी होईल. त्यातून पत्रकारांसाठी सुध्दा ही सुगीच आहे असेच म्हणावे लागेल. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुध्दा निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुगीच आहे. कारण यावेळेत कोणत्याही अधिकाऱ्याला कोणताही नेता काही सांगण्यास धजावणार नाही.
जेंव्हा सुगी येते सर्वत्र आनंद पसरतो असा आनंद मतदारांसाठी पण आहे. काही नेते मंडळी एकूण मतदानाच्या आधारावर प्रत्येक मतदाराला काही मोदक देण्याचे मनसुबे बांधतील. त्यातील गटा-गटावर लक्ष ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक नेमला जाईल आणि त्या पर्यवेक्षकाची सुध्दा त्या सुगीच होईल. या प्रक्रियेमध्ये 100 लोकांना मोदक मिळाले तर 50 लोक आपल्याला मतदान करतील हा त्याचा मुळ गाभा आहे. भारतीय लोकशाहीमध्ये 30 ते 35 टक्के मतदान घेणारा व्यक्ती जिंकतो हा ईतिहास आहे आणि तो नेहमी पुन्हा-पुन्हा समोर येतो आहे.
यासोबतच जातीय समिकरणांवर विचार होईल. भारतीय संविधानाने जात-पात या विषयावर कठोर शब्द जनतेच्या वागणूकीवर दिलेले आहेत. परंतू त्याची खिल्ली उडवत पुन्हा जात या विषयावर निवडणुकांमध्ये वेगळाच प्रभाव होतो. जातीय समिकरणांच्या आधारावर त्यातील एक मोहरक्या निवडला जातो. त्या मोहरक्याचे जातीतील लोक किती ऐकतात याचा काही एक भरवसा नसतांना त्याच्यावर विश्र्वास ठेवला जातो आणि त्या मोहरक्याची सुध्दा सुगीच होते.
वर्षातून आम्ही ज्या सुगीला मानतो ती कृषीवर आधारीत आहे. परंतू आजच्या भयाण परिस्थितीत लोकसभा निवडणुकीतील प्रक्रियेत सुध्दा सुगी कशी येते हे मांडण्याचा या शब्द प्रपंचातून केलेला हा आमचा छोटासा प्रयत्न.