नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली असून अवघ्या दहा दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 16 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत 56 गुन्हे दाखल करत तब्बल 60 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे आणि समाजात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा प्रसार रोखावा, या उद्देशाने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
मोठ्या प्रमाणावर कारवाई
दिनांक 16 मार्च ते 25 मार्च या कालावधीत गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123 अंतर्गत कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी छापे टाकून गुटखा, पानमसाला, खर्रा, मावा तसेच सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपींवरही पोलिसांनी कारवाई केली. आरोपींकडून एकूण 60,21,189 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन हजारांहून अधिक दुकाने तपासणीखाली
मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील दोन हजारांहून अधिक दुकाने व पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.
कठोर शिक्षेची तरतूद
भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत होणारे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून अशा प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयात खटला चालतो. दोषी आढळल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास तसेच दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
‘खबर’ हेल्पलाइन सुरू
अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना थेट पोलिसांना माहिती देता यावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील गुटखा किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक याबाबत माहिती 9150100100 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
