दुपारी बारा वाजता गाडीपुरा परिसरातील रेणुका मंदिरासमोरून रामजन्म मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीचे नियोजन आणि सूत्रसंचालन गणेशसिंह कौंडिण्य तसेच कालू ओझा यांनी कुशलतेने सांभाळले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालावर आणि भजनांच्या स्वरात मिरवणूक मार्गक्रमण करत होती. विविध भजनी मंडळी, धार्मिक संघटना आणि सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
मिरवणुकीत महापुरुषांचे आकर्षक फोटो, धार्मिक संदेश देणारे देखावे तसेच सामाजिक विषयांवर आधारित संदेशमूल्य असलेली चित्ररचना सादर करण्यात आली होती. महिलांच्या सबलीकरणावर आधारित देखावे विशेष आकर्षण ठरले. यासोबतच ऑपरेशन सिंदूर या विषयावरील चित्ररचना देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
यंदाच्या मिरवणुकीतील सर्वात आकर्षक आणि वाखाणण्याजोगा देखावा म्हणजे भगवान नरसिंह यांचा होता. भक्तांनी नरसिंह भगवानाच्या देखाव्याभोवती गर्दी करत दर्शन घेतले. नारायण नारायण हरी हरी, तेरी महिमा सबसे न्यारीन्यारी या भजनाच्या सुरांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले होते. गायक कलाकारांनी “केसरिया के लाल मेरा छोटासा ये काम”, जय सियाराम यासारखी भक्तिगीते सादर करून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले.
मिरवणूक शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत होती. वृत्त प्रकाशीत करे पर्यंत मिरवणूक वजिराबाद चौका पर्यंत पोहचली होती, पुढे शिवाजीनगर, राज कॉर्नर मार्गे पुढे जात अखेर अशोक नगर येथील मंदिरात रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचा समारोप होणार आहे. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले.अनेक ठिकाणी भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते,अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.
रामनवमी निमित्त शहरातील अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जुना मोढा परिसरातील राम मंदिर, नावघाट येथील राम मंदिर ,सिडको येथील राम मंदिर आणि इतर सर्वच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हनुमान मंदिरातही रामजन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा पार पडली. भक्तांना पारंपरिक पंजेरी प्रसादाचे वितरण करण्यात आले.
रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशभरात वाढलेली श्रीरामभक्तीची भावना नांदेडमध्येही स्पष्टपणे दिसून आली. धार्मिक एकात्मता, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक शहराच्या धार्मिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव ठरली. भक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण शहर रामनामाच्या घोषात न्हाऊन निघाले आणि रामजी की निकली सवारी,रामजी की लीला है न्यारी या भावनेचा अनुभव प्रत्येक नागरिकाने घेतला.
मिरवणुकीतील छायचित्रे ….

