नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात दिनांक १६ ते १९ मार्च २०२६ या चार दिवसांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ व १७ मार्च रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दि. १८ व १९ मार्च रोजी हा वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, तसेच विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. विजेच्या खांबांपासून, तारांच्या कुंपणापासून, उंच झाडांपासून व लोखंडी वस्तूंपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर, शॉवरखाली आंघोळ, नळांना स्पर्श करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घरात असतानाही दारे किंवा खिडक्यांजवळ उभे राहून विजा पाहणे धोकादायक ठरू शकते, याची दक्षता घेण्याचे सांगितले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 775 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याने डॉ. सान्वी जेठवाणी नाराज अमेरिकेच्या सांगण्यावरून पकडलेले तीन टँकर सोडून भारत युद्ध रोखण्याच्या स्थितीत येणार काय ?