नांदेड – जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. याअंतर्गत मुक्तीरथाद्वारे जनजागृती, स्वाक्षरी मोहीम आणि १०० दिवसांचे विशेष उपक्रम राबवून प्रशासनातर्फे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश समाजाला बालविवाहाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि ‘संपूर्ण समाज’ दृष्टिकोनातून बालविवाह मुक्त भारत घडवणे हा आहे. या पार्श्वभूमीवर शालेय वयापासूनच बालविवाहाविरोधात मत बनविणे आणि पालकांमध्ये जागृती करण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. या उद्देशाने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधत शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींकडून व त्यांच्या पालकांकडून मुलींसाठी १८ आणि मुलांसाठी २१ वर्षे वयापर्यंत बालविवाह न करण्याचे चक्क प्रतिज्ञापत्रच भरुन घेतले आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १०० दिवसांचे विशेष अभियान राबवून गावपातळीवर ग्रामपंचायतींद्वारे बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले जात आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार वय १८ वर्षांखालील मुलीचे किंवा २१ वर्षांखालील मुलाचे लग्न रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावू नयेत; ते केल्यास काय शिक्षा होवू शकते, हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या आहेत. या अंतर्गत शाळेतील मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वयातच बालविवाहाविरोधी योग्य संस्कार होण्यासाठी शाळेतील मुलामुलींकडून व त्यांच्या पालकांकडून दोन टप्प्यांत बालविवाह विरोधात प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. काय लिहिले आहे प्रतिज्ञापत्रात? मुलींनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मी माझे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण करीन. कोणाच्याही सांगण्यावरून, दबावापोटी अथवा कोणत्याही आमिषाला बळी पडून माझ्या वयाची १८/ २१ वर्षे पूर्ण होण्याआधी मी माझ्या विवाहास संमती देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत माझा बालविवाह होणार नाही, याची पूर्णपणे जबाबदारी घेईल असे म्हटले आहे. या मुलींच्या पालकांनीही अशाच आशयाचे प्रतिज्ञापत्र स्वाक्षरीनिशी लिहून शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिले आहे. Kanthak Suryatal Post Views: 526 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आयर्न डोमचा भ्रम फुटला? इराण-हिज्बुल्लाच्या हल्ल्यांनी इस्त्रायलची कोंडी ’पवार साहेब आज कुठे उभे आहेत?’