छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील महानाट्याचा पहिला प्रयोग
चार मजली सेट साकारला ;मैदानावर उभी झाली तटबंदी
जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क
नांदेड,- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग उद्या दिनांक ९ मार्चपासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे महानाट्य बघण्यासाठी कोणत्याही प्रवेशिकांची गरज नसून प्रवेश निशुल्क आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या प्रयोगाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे. 9, 10 व 11 मार्च रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांपैकी एक दिवस प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज गुरुद्वारा मैदानाला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. वाहनतळ, रस्ते मार्ग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बैठक व प्रकाश व्यवस्था याची पाहणी केली. दररोज दहा हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे .
प्रत्येक शाळेने या संदर्भातले दिवस वाटून घेतले असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा. प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.
आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. मैदानावर चार मजली सेट उभारण्यात आला असून उद्या नांदेडकरांसाठी पहिला प्रयोग करण्यासाठी शिवगर्जनाची चमू तयार झाली आहे.