नांदेड/हदगाव (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि नांदेड शहर परिसरात घरफोडी व चैनस्नॅचिंगच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.या दोन घटनांमध्ये ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
हदगावमध्ये घरफोडी; दोन लाखांहून अधिक माल लंपास
हदगाव शहरातील श्रीकृष्ण नगर भागात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
शिवदास प्रल्हादराव कुबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाच्या कडीकुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनकक्षातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. हदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नंद हे करीत आहेत,
नांदेडमध्ये महिलेचे गंठण हिसकावले
दुसऱ्या घटनेत नांदेड शहरातील माणिक नगर परिसरात चैनस्नॅचिंगची घटना घडली. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता विद्या बाळासाहेब भोपळे (रा. माणिक नगर) या शिवाजी माध्यमिक शाळा गेटच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमा प्रमाणे गुन्हा क्रमांक 102/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले अधिक तपास करत आहेत.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या दोन घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांनी घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच एकटे फिरताना मौल्यवान दागिने उघडपणे न घालण्याचे आवाहन केले आहे.दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
