मुदखेड (प्रतिनिधी)- आपण पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून जात असलेल्या ५१ वर्षीय शेतकऱ्याला अडवून दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत बनावट अंगठ्या देऊन फसवणूक केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे. या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवघा (ता. मुदखेड) येथील शेतकरी प्रकाश माधवराव पवार (वय ५१) हे ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून लोखंडे व आदमाने यांच्या दुकानासमोरून जात होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. संबंधितांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत पवार यांची झडती घेतली.
या दरम्यान आरोपींनी पवार यांच्या हातातील सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. त्याऐवजी बनावट अंगठ्या देऊन आरोपींनी त्यांची फसवणूक करून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२/२०२४ नोंदविण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास जमादार ठाकूर हे करीत आहेत.
दरम्यान, जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सन २०२६ सुरू असताना हा गुन्हा सन २०२४ मध्ये दाखल झाल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
