पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड :- दि. 10 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.

शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची इयत्ता बारावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांद्वारे झूम वेबकास्टच्या माध्यमातून थेट निरीक्षण करण्यात येणार असून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्ह्यात महसूल विभागाचे विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तसेच तालुका स्तरावरून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. शिक्षण विभागाची सहा विशेष पथके देखील परीक्षेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

तसेच स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक हे देखील जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी तसेच परीक्षा यंत्रणेत कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीक्षा कॉपीमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!