2010 मध्ये 4 हजारांची लाच घेणाऱ्याला कैदेसह 2026 मध्ये 50 हजार रुपयांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-2010 मध्ये लाच घेणाऱ्या निरिक्षक वैद्यमापन शास्त्र कार्यालय देगलूर येथील निरिक्षकाला आज 16 वर्षानंतर 1 वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तानाजी सोलंकर यांनी ठोठावली आहे. वैद्यमापन निरिक्षक 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. या प्रकरणात तक्रादाराला वैद्यमापन निरिक्षकाने लाचेची 4 हजार रुपये रक्कम हात उसणी दिली होती असे कागदपत्र तयार करण्यात आले होते आणि त्यासंदर्भाने दोन बचावाचे साक्षीदार सुध्दा तपासण्यात आले होते.
जुन्या नांदेड भागात मराठवाडा स्केल ऍन्ड वेट ट्रेडर्स नावाची दुकान आहे. वजने मापे आणि दुरुस्तीचा परवाना या दुकानाकडे आहे. दि.1 जुलै 2010 रोजी दुकान मालक मोहम्मद युसूफ हुसेन सिद्दीकी काटेवाले यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नईम हाशमी यांच्यासमक्ष तक्रार दिली होती की, दि.22 जून 2010 ते 26 जून 2010 या चार दिवसादरम्यान कंधार येथे वैद्यमापन निरिक्षक सुभाष लक्ष्मण राठोड यांच्या पुढाकारातून वजन मापे तपासणी व दुरूस्ती कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये हात काटे, टेबल काटे, बिम स्केल, प्लॅटफार्म काटे, इलेक्ट्रॉनिक्स काटे, मिटर पट्टी, पेग पिझर यांची तपासणी झाली. कंधार शहर आणि तालुक्यातील 258 व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांची तपासणी करून दुरूस्ती करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी शासकीय फिस 5 हजार, 15 हजार आणि 1100 असे एकूण 21 हजार 100 रुपये चलनाद्वारे बॅंकेत भरण्यात आले होते.
यानंतर व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांवर मारलेल्या शिक्यांप्रमाणे त्यांना वैद्य मापन शास्त्र विभागाने प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. ते प्रमाणपत्र देण्याची विनंती निरिक्षक सुभाष लक्ष्मण राठोड यांना करण्यात आली. तेंव्हा त्यांनी 4 हजार रुपयांची लाच मागणी केली. व्यापाऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही तर ते त्रासतील म्हणून लाचेची तक्रार दिली.
2 जुलै 2010 रोजी वजिराबाद भागातील महाविर चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये हा चहा पिण्याचा प्रकार घडला आणि तेथेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 4 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सुभाष लक्ष्मण राठोड (45) यास ताब्यात घेतले. या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 13 नुसार गुन्हा क्रमांक 3043/2010 वैद्यमापन निरिक्षक सुभाष लक्ष्मण राठोड विरुध्द दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा दोषारोप दाखल झाल्यानंतर त्या संचिकेला विशेष लाच लुचपत प्रतिबंधक खटला क्रमांक 6/2021 देण्यात आला. 2011 मध्ये दाखल झालेल्या या दोषारोपाचा निर्णय 2026 मध्ये आज दि.4 फेबु्रवारी 2026 रोजी आला. या प्रकरणात तिन फिर्यादींचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे पुत्र, तपासीक अंमलदार नईम हाशमी आणि दोषारोपाची पडताळणी करून परवानगी देणारे वैद्यमापन नियंत्रक डॉ.माधव सानप यांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. या खटल्यात 16 जून 2016 रोजी सुभाष राठोड यांनी आपल्या वरिष्ठांना मी 4 हजार रुपये हात उसणे फिर्यादी महम्मद हुसेन यांना दिले आहेत आणि परत मागितले तर ते देत नाहीत असा अर्ज दिसला. या संदर्भाने बचाव पक्षाचे वकील ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खाण्डील) यांनी दोन बचाव पक्षाचे साक्षीदार सुध्दा तपासले.
न्यायालयासमक्ष उपलब्ध असलेल्या पुरावा आणि युक्तीवादाच्या आधारे न्यायाधीश तानाजी सोलंकर यांनी वैद्यमापक निरिक्षक सुभाष लक्ष्मण राठोड यांना लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम 7 प्रमाणे 1 वर्ष शिक्षा आणि 25 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 13 प्रमाणे एक वर्ष शिक्षा आणि 25 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा एकत्र भोगाच्या आहेत. पण दंड 50 हजार रुपये भरावा लागेल. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी मांडली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने पोलीस अंमलदार प्रदीप खंदारे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!