नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे अपघाती निधन होणे ही मनाला चटक लावणारी बाब आहे. अजित पवार हे जे बोलत होते करून दाखवित होते. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा असे ते नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. मागील 10 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात होतो त्यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. सकाळी 7 वाजता उठून हा नेता रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची कामे करायचा. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे मला वाटत होते परंतू त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जनसामान्यांसाठी कार्य करून त्यांच्या कार्यशैलीचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो तसेच पवार कुटूंबाला या संकटातून सावरण्याची ताकद ईश्वराने द्यावी असा शोकसंदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी व्यक्त केला.
दुरदृष्टी असलेला नेता हरवला-डॉ.सुनील कदम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अभ्यासू आणि दुरदृष्टी असलेले नेते होते. प्रत्येकाच्या मदतीला धावण्याची त्यांची प्रवृत्ती होती. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचे मोठे योगदान आहे. त्यांचे अकाली अपघाती निधन हे मनाला सुन्न करणारे आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा दुरदृष्टी असेला नेता हरवला आहे. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो तसेच पवार कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो असा शोकसंदेश राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी व्यक्त केले.
—————————
भविष्य घडविणारा नेता -भगवानराव पाटील आलेगावकर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघातात निधन झाले आहे ही बातमी ज्या वेळेला प्रसारमाध्यमातून कळली त्यावेळेला मन सुन्न झाले. ही घटना अत्यंत वाईट असून जनतेसाठी नेहमीच काम करणारे नेते ते होते. अशा महान आणि कतृत्ववान नेत्यावर काळाने घाला घातला आणि संकट कोसळले. महाराष्ट्राचा भविष्य घडविणारा नेता आता हरवला आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो असा शोकसंदेश राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी व्यक्त केला आहे.
