गोदी पत्रकार रोज आपल्या समोर हिंदुत्वाचे पोवाडे गातात; पण खरे पाहता हिंदुत्वाचे सर्वात मोठे शत्रू हे स्वतःच आहेत. काल-परवाच टीआरपी वाढवण्यासाठी यांनी जे नाटक केले, ते पाहून राक्षसालाही लाज वाटावी. एआय जनरेटेड राक्षस दाखवायचा, मग तोच राक्षस थेट शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतींमध्ये “रूपांतरित” करायचा! आता यांना हिंदुत्व कळतं म्हणायचं की कॉमिक शो म्हणायचा, हा प्रश्न आहे.
याच खेळाचा पंचनामा मोलिटिक्सच्या निवेदिता शांडिल्यांनी केला आणि रुबिका लियाकत अशी पत्रकारितेची नवी व्याख्या समोर आली. दुर्दैव म्हणजे, आजकाल या गोदी पत्रकारांचा अभिनयसुद्धा फारसा जमून येत नाही. भगव्या मंचावर उभं राहूनही ते इतक्या उघडपणे बोलतात की स्क्रिप्टपेक्षा टीआरपीच जास्त दिसते.दोन धर्मांमध्ये दोन कोंबड्यांसारखी झुंज लावणं हीच जणू त्यांची जबाबदारी बनली आहे. हिरवे कपडे घातले म्हणजे समाजवादी आणि भगवे कपडे घातले म्हणजे हिंदुत्ववादी हा कोणत्या फॅशन शोचा नियम आहे? कपड्यांचा रंग बदलला म्हणून विचार बदलत नसतात. समाज घडतो तो विचारांवर ते विचार स्पष्ट, पारदर्शक, समाजप्रेमी आणि भारतीय संविधानाच्या चौकटीतले असायला हवेत.

निवेदिता शांडिल्यांचा सवाल खूप साधा पण बोचरा आहे: “कोणत्या पुस्तकात लिहिलंय की भगवा रंग हिंदूंचा आणि हिरवा रंग मुसलमानांचा?” हे रंग कुणी पसरवले? तर याच हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या गोदी पत्रकारांनी!हेच गोदी अँकर मोठ्या आवेशात विचारतात देश आधी की धर्म आधी? पण खरं तर या दोघांनाही देशाबद्दल काडीचंही प्रेम नाही. त्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर असतंआपला मटका कसा भरणार! त्यामुळे जगात भारताची प्रतिमा कशी बिघडतेय, याची यांना कल्पनासुद्धा नसते.
यांच्यासाठी धर्मही महत्त्वाचा नाही. यांचा खरा धर्म आहे एका विशिष्ट राजकीय पक्षाचा धर्म. मागच्या आठवड्यात याच गोदी अँकरांचं प्रेम खासदार असदुद्दीन ओवेसींवर ओसंडून वाहत होतं. पण त्याच वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींच्या शिष्यांवर हल्ले होत होते, केस ओढले जात होते. तेव्हा सरकारला प्रश्न विचारायचे सोडून, हे अँकर थेट शंकराचार्यांनाच जाब विचारत होते वरून त्यांच्याविरोधात नकारात्मक कथा तयार करत होते.

दहा वर्षं हिंदू-मुस्लिमचा रागरंग लावून निवडणुका चालवणारे हेच अँकर आज थेट शंकराचार्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. निवेदितांच्या म्हणण्यानुसार, या सगळ्या अँकरांचा एकच धर्म आहे भारतीय जनता पार्टी धर्म. आणि त्यातही एकमेकांपेक्षा जास्त निष्ठावान कोण, याची स्पर्धा सुरू असते. इतिहासात राजदरबारात “भाट” असायचे. आजचे गोदी अँकर त्या भाटांपेक्षाही एक पाऊल पुढे गेलेत. ते भाट तरी सोन्याच्या नाण्यांसाठी राजांची स्तुती करत होते; हे अँकर मात्र टीआरपीसाठी आत्मा गहाण ठेवतात.
“शिकले-सवरलेले लोक” हा शब्दप्रयोग जर आजच्या गोदी अँकरांसाठी वापरला, तर तो त्या शब्दाचाच अपमान ठरेल. उदाहरण घ्यायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धासाठी शांती प्रक्रियेच्या बोर्डात भारत आणि पाकिस्तान दोघांनाही निमंत्रण दिलं. त्या बोर्डाचा सदस्य होण्यासाठी तब्बल एक अब्ज डॉलर (सुमारे ८००० कोटी रुपये) फी आहे ती भारतालाही आणि पाकिस्तानलाही लागली आहे, आणि त्यासाठी तीन वर्षांची सूटही आहे. पण गोदी अँकरांनी काय दाखवलं? “फक्त पाकिस्तानला फी भरावी लागते!” इतकी अर्धवट, सोयीस्कर आणि टीआरपी पूरक पत्रकारिता! एकूण काय, हिंदुत्वाचं ढोंग, देशप्रेमाचा देखावा आणि पत्रकारितेच्या नावाखाली चाललेला हा सर्कस याचा खरा राक्षस पडद्यामागे नाही, तर स्टुडिओत बसलेला आहे.

