हदगाव (प्रतिनिधि) – हदगाव तालुक्यातील वाघे फाटा–वाळकी फाटा परिसरात आढळलेल्या एका महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा हदगाव पोलिसांनी यशस्वीपणे उलगडा केला असून या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याच्या कारणावरून या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी वाळकी फाट्याजवळ एका 56 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या संदर्भात हदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरण क्रमांक 1/2026 नोंदवण्यात आले होते. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन सुदाम बर्गे करीत होते.तपासादरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणे, 10 जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजता, हदगाव येथील गौतम नगरमध्ये कमलाबाई गंगाधर क्षीरसागर (54) यांच्या घरी त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून दिवसभर घरात ठेवण्यात आला व सायंकाळी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो मृतदेह वाळकी फाटा परिसरात फेकून देण्यात आला.
या गुन्ह्यात
- सुचिता नागेश क्षीरसागर (वय 35, रा. गौतम नगर, हदगाव)
- परमेश्वर किशन वानखेडे (वय 26, रा. वटफळी, ता. हिमायतनगर)
- अमोल लोभाजी इटकरे (वय 38, रा. नागापूर, ता. उमरखेड)
- अक्षय नारायण कदम (रा. निवघा बाजार, ता. हदगाव)
यांनी संगनमताने कट रचून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत कमलाबाई क्षीरसागर या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत होत्या, त्यामुळेच हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणातील सर्व चार आरोपींना गुन्हा क्रमांक 19/2026 मधे हदगाव पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हदगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करीत आहेत
