नांदेड/लोहा (प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळणारी शेतजमीन आपल्या नावावर झाल्यानंतर ती विक्री करू, असे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० मे २०२४ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी जुना मोंढा भागात दुकान असलेले सतीश मारोतराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बालाजी हरी गोरे (रा. कवठा), मारुती नारायण गुंडाळे (रा. कवठा), सौ. सुमनबाई नारायण साखरे, नारायण राजाराम साखरे व राजेश नारायण साखरे (सर्व रा. पिंपरखेड, ता. हदगाव) यांनी संगनमत करून फसवणूक केली.आरोपी सुमनबाई साखरे यांनी त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन वारसा हक्काने मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला असल्याचे सांगितले होते. सदर जमीन त्यांच्या नावावर झाल्यानंतर ती जमीन फिर्यादी सतीश शिंदे यांना विक्री करण्याचे ठरविण्यात आले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आणि इतरांनी टप्प्याटप्प्याने एकूण दोन कोटी रुपये आरोपींना दिले. व्यवहारासाठी ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर करारनामा तसेच १०० रुपयांची पावती लिहून घेण्यात आली.
मात्र, नंतर आरोपींनी न्यायालयातून दावा मागे घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, सतीश शिंदे यांच्यासह इतर काही जणांकडूनही या व्यवहारात पैसे घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९/२०२६ दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटके अधिक तपास करीत आहेत.
लाख रुपये घेऊन एक कोटीचे सोने देण्याचे आमिष; लोहा पोलिसांत गुन्हा
दरम्यान, मौजे पारडी, तालुका लोहा येथे नवीन घर बांधकामाच्या ठिकाणी ६० लाख रुपयांत एक कोटी रुपयांचे सोने देतो, अशी बतावणी करून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी ओमकार विश्वनाथ भुरे (रा. शिराढोण, सध्या मुक्काम कवठा) यांनी १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता सचिन बालाजी खेडकर (रा. खेडकरवाडी) यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे सोने न देता त्यांची फसवणूक केली.या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३/२०२६ दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
