मतदान : अधिकार नव्हे, जबाबदारी

मतदान हा लोकशाहीचा कणा आहे.
तो केवळ एक अधिकार नसून,
समाजाच्या भविष्याची जबाबदारी आहे.

माणूस अनेकदा
इतरांच्या चुका लगेच पाहतो,
पण स्वतःच्या निर्णयातील
चूक ओळखू शकत नाही.
याच मानसिकतेचा परिणाम
निवडणुकीच्या काळात
आपल्या मतदानावर होताना दिसतो.

आज मतदाराला सर्व काही माहीत आहे
कोण काय बोलतो,
कोण कसे वागतो,
कोण पात्र आहे
आणि कोण अपात्र आहे.

तरीही
नातेसंबंध,
पैशांचा मोह,
अंध निष्ठा,
पक्षीय दबाव
या कारणांमुळे
मतदान करताना
विवेक बाजूला ठेवला जातो.

हे विसरू नये की
योग्य मतदान
वॉर्डचा विकास घडवू शकते,
तर चुकीचे मतदान
पुढील पाच वर्षांचा
अन्याय, दुर्लक्ष
आणि अंधकार ठरू शकते.

म्हणून मतदान करताना
जात, धर्म, पक्ष
किंवा ओळखीपेक्षा
एकच प्रश्न स्वतःला विचारा
हा उमेदवार माझ्या वॉर्डसाठी
निर्भयपणे उभा राहील का?
हा उमेदवार
दबावाला न झुकता
जनतेचा आवाज बनेल का?

आजचे वास्तव असे आहे की
सत्तेसाठी
सर्वच पक्ष
वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात.
म्हणूनच
मतदाराने अधिक जागरूक,
स्वतंत्र आणि विवेकशील
होणे गरजेचे आहे.

सभ्य बोलणारा
किंवा गोड शब्द वापरणारा
नेहमीच काम करणारा असेल,
असे नाही.
त्याचप्रमाणे
थोडी नकारात्मक प्रतिमा असलेला
माणूसही
विकासासाठी झटणारा
आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणारा
असू शकतो.

म्हणून
मत सुंदर चेहऱ्याला नव्हे,
तर ठाम भूमिकेला द्या.
मत आश्वासनांना नव्हे,
तर कृती करण्याची हिंमत
दाखवणाऱ्याला द्या.

कारण योग्य मतदान
आजचा निर्णय नसून,
उद्याचे भविष्य ठरवते.

 

– राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!