सांताक्लॉजची टोपी गुन्हा ठरते, पण जमावशाही निर्दोष ठरते!
बनारसच्या घाटावर विदेशी पर्यटकांचा अपमान : भारताच्या प्रतिमेला तडा
२५ डिसेंबरच्या आसपास घडलेल्या घटनांनी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आधीच धुळीस मिळाली असताना, बनारसच्या गंगा घाटावर घडलेला प्रकार म्हणजे त्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. सांताक्लॉजची टोपी आणि लाल अंतर्वस्त्र परिधान करून गंगेत आंघोळीस उतरलेला एक जपानी पर्यटक जमावाच्या संतापाचा बळी ठरतो, आणि दुसऱ्याच दिवशी काशीचे पोलीस अधीक्षक ठामपणे सांगतात—“असं काही घडलंच नाही!”
हा तोच पवित्र घाट आहे, जिथे काही वर्षांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हातात आरतीची थाळी देत भारत–जपान मैत्रीचा गजर करण्यात आला होता. विदेशी पर्यटक आणण्याची स्वप्ने, करार, घोषणांचे फुगे फुगवले गेले. पण आज त्या स्वप्नांचा फुगा सांताक्लॉजच्या टोपीनेच फुटतो, हीच विडंबना!घटना घडते, व्हिडीओ तयार होतो, आणि स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले जाते—“गप्प बसा.” वर्तमानपत्रे गप्प बसतात, पण युट्युब आणि इन्स्टाग्राम बोलतात. जग पाहते, जग हसते, आणि भारत पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत बसतो.

‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना आता फक्त पोस्टरपुरती उरली आहे काय? पाहुण्याने चूक केली असेल तर समजावून सांगायचे असते, लाठी-शब्दांचा वर्षाव करायचा नसतो. सांताक्लॉजची टोपी घालणे जर बनारसमध्ये गुन्हा असेल, तर मग ती विकणारी दुकाने बंद करा. नाहीतर जमावाच्या हिंसेला धर्माची लेबलं लावून पावन ठरवू नका.पोलिस सांगतात—“दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली.” प्रश्न असा आहे की, जमाव आणि विदेशी पर्यटक यांच्यात तडजोड कशी? पर्यटक हात जोडून माफी मागतो, महिला भयभीत अवस्थेत जमिनीवर बसलेल्या दिसतात, आणि यालाच ‘समजूत’ म्हणायचे? ही समजूत नाही, ही सरळसरळ जबाबदारी झटकण्याची कला आहे.

गंगेत लघवी केल्याचा आरोप होतो, पण साक्षीदार कोणीच नाही. पुरावा नाही, पण संताप मात्र पुरेपूर. हा धार्मिक आस्था जपण्याचा प्रकार नसून, घृणा आणि दहशतीचा सार्वजनिक प्रयोग आहे—तालिबानी मानसिकतेचा भारतीय अवतार.बनारसच्या ८४ घाटांपैकी राजेंद्र प्रसाद घाटावर रोज आरती होते. तिथेच आज एक विदेशी पर्यटक माफी मागताना दिसतो. हे दृश्य पवित्र नाही, ते लज्जास्पद आहे.

आज प्रश्न बनारसचा नाही, प्रश्न देशाचा आहे. हजारो लोकांची रोजीरोटी विदेशी पर्यटकांवर अवलंबून आहे. उद्या हे पर्यटक म्हणाले, “भारत नको,” तर त्याची किंमत कोण मोजणार? सांताक्लॉजची टोपी पाहून भडकणारे अंधभक्त की ‘घडलंच नाही’ म्हणणारी यंत्रणा?ज्या बनारसला टोकियो बनवण्याची स्वप्ने दाखवली गेली, तिथे आज जपानी पर्यटक अपमान सहन करतो. जग लिहित आहे, बोलत आहे, हसत आहे—आणि भारत मात्र अजूनही तडजोडीच्या कथा सांगत बसला आहे.ही बदनामी केवळ बनारसची नाही; ही संपूर्ण देशाची सार्वजनिक नाचक्की आहे.
