कायद्यापलीकडचा प्रश्न : समाजाला हादरवणारी कौटुंबिक शोकांतिका
नांदेड,(प्रतिनिधी)-परवा सकाळी रेल्वे पटरीवर दोन युवकांचे मृतदेह आणि त्यांच्या घरात आई-वडिलांचे मृतदेह आढळल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात आणि समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे धक्कादायक वास्तव उघड झाले. संबंधित दोन्ही भावांनी आधी आपल्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली, असा हा संपूर्ण घटनाक्रम आहे.
या प्रकरणी भारत पोलीस ठाण्यात मृत पावलेल्या दोन भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही केवळ कायदेशीर प्रक्रिया असून, यातून काहीही साध्य होणार नाही. कारण ज्यांना मारले गेले ते मृत झाले आहेत आणि ज्यांनी खून केला त्यांनीही स्वतःचे जीवन संपवले आहे. कायद्याच्या भाषेत अशा प्रकरणाला “बी-समरी” गुन्हा असे संबोधले जाते.
२५ डिसेंबर रोजी सकाळी उमेश रमेश लखे (वय २५) आणि बजरंग रमेश लखे (वय २२) या दोन भावांचे मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, घरात त्यांची आई राधाबाई रमेश लखे (वय ४८) आणि वडील रमेश होनाजी लखे (वय ५५) हेही मृत अवस्थेत आढळून आले. यासंदर्भात तत्काळ भारत पोलिसांनी दोन अकस्मात मृत्यूंची नोंद केली.
पुढील तपासात मात्र भयंकर वास्तव समोर आले. वैद्यकीय अहवालानुसार, दोन्ही पालकांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. सध्याच्या माहितीनुसार लखे कुटुंबाकडे साडेतीन एकर शेती होती. काही जमीन विक्रीबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जाते. वडील रमेश लखे हे अर्धांगवायूने ग्रस्त होते, तसेच त्यांना हृदयरोगाचाही त्रास होता.
घरातील आर्थिक परिस्थिती, आजारपण आणि इतर ताणतणावांमुळे कंटाळून त्या रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास दोन्ही भावांनी एकत्र येऊन आपल्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ते घराबाहेर पडले. अनेक नागरिकांनी त्यांना बाहेर जाताना पाहिले होते. ते मुकाट रेल्वे स्थानकावर आले, तेथेही ते पाहिले गेले. ज्या रेल्वेगाडीसमोर त्यांनी आत्महत्या केली, त्या रेल्वेच्या चालकांनीसुद्धा त्यांना उडी मारताना पाहिले असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणातून एक गंभीर बाब अधोरेखित होते आई-वडिलांचा सांभाळ करणे अवघड होत असल्याने मुलांनी त्यांचा खून केला आणि त्यानंतर तीव्र आत्मग्लानीतून स्वतःचेही जीवन संपवले. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारा आहे.मात्र समाज म्हणून या घटनेकडे केवळ शोकांतिकेच्या नजरेने न पाहता, गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. युवकांवर येणारा मानसिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि सामाजिक आधार याबाबत सखोल विचार होणे आवश्यक आहे. अशा टोकाच्या निर्णयांपर्यंत युवक का पोहोचतात, याचा शोध घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना कोणत्याही कुटुंबात घडू नयेत.
