कोकण म्हणजे स्वर्ग नव्हे, तर आता विषारी प्रयोगशाळा बनवण्याचा सरकारी प्रकल्प झाला आहे का, असा प्रश्न आज प्रत्येक सुजाण नागरिकाला पडतो. कोकणात उभारल्या जाणाऱ्या विषारी प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड व यकृत निकामी होण्याचे वाढते प्रमाण या सगळ्यावर चर्चा खूप झाल्या. पण चर्चा झाली म्हणजे कृती झालीच असे नाही, हेच दुर्दैव कोकणाच्या नशिबी आले आहे.
शेकडो विषारी कंपन्या कोकणात उभारल्या गेल्या, जनतेला धोका आहे हे माहीत असूनही. इटलीमध्ये ज्या कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे जनतेने रस्त्यावर उतरून आवाज उठवला, तीच कंपनी आज कोकणात मोकाट सुटली आहे. इटलीत एका नर्स महिलेने आपल्या मुलीच्या शरीरात आढळलेल्या घातक रसायनांविरोधात आवाज उठवला, तोपर्यंत तब्बल साडेतीन लाख लोक विविध आजारांनी ग्रस्त झाले होते. शेवटी सरकारला जाग आली, ती कंपनी बंद पडली, काही संचालक तुरुंगात गेले.


पण ही कंपनी नष्ट झाली नाही फक्त कपडे बदलले.
इटलीतील पाप धुऊन, “लक्ष्मी केमिकल्स” या गोंडस नावाने ती थेट कोकणातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये अवतरली. काम तेच, विष तेच, फक्त नाव बदलले जणू गुन्हेगाराने टोपी बदलली!
इंग्लंडमधील गार्डियन या वृत्तपत्राने 31 ऑक्टोबर 2025 रोजी ही बाब उघड केली. इंग्लंडमध्ये बातमी छापली जाते, पण भारतात मात्र शांतता. प्रश्न पडतो—भारतामध्ये आवाज उठवणाऱ्यांचे गळे दाबले गेले आहेत का? की ही “विकलेली पत्रकारिता” नावाची महामारी आहे?
फक्त लेख लिहून, चर्चा करून काही होणार नाही. आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. कोकणात विष ओकणाऱ्या कंपन्यांविरोधात जनतेने थेट संघर्ष केला पाहिजे.कारण हा सगळा प्रकार राजकीय आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. आम्ही असे लोक निवडून देतो का, ज्यांना आमच्या जीवाची किंमत शून्य आहे? आणि तरीही आम्ही अभिमानाने म्हणतो आम्ही लोकशाहीत जगतो, जिथे संविधानाने जगण्याचा हक्क दिला आहे!
ही कंपनी इटलीहून चार हजार किलोमीटर सागरी प्रवास करून कोकणात आली. इटलीमध्ये ही कंपनी पीएफएस (Forever Chemicals) नावाचे रसायन तयार करत होती जे कधीच नष्ट होत नाही. अशा रसायनांसाठी कडक नियमावली असते. पण ही कंपनी नियम पायदळी तुडवत होती, म्हणूनच तिथल्या परिसरात गंभीर आजार पसरले.
नियमांनुसार या रसायनाचे प्रमाण 8 नॅनो मिलिग्राम प्रति लिटर असायला हवे होते. पण तपासणीत काही लोकांच्या शरीरात तब्बल 90,000 नॅनो मिलिग्राम आढळले! म्हणजे विष किती खोलवर झिरपले होते याची कल्पनाच पुरेशी आहे.2018 मध्ये इटलीमध्ये बंद पडलेली ही कंपनी, त्याच यंत्रसामग्रीसह जहाजांद्वारे भारतात आणली गेली. भारतात तिचे नाव “लक्ष्मी ऑरगॅनिक लिमिटेड”. नावात लक्ष्मी, कामात मृत्यू!

मुंबईस्थित हर्षवर्धन वासुदेव गोयंका हे यातील संचालक. 1991 पासून महाडमध्ये ऍसिड तयार करणारा उद्योग आणि आज कोकणात विषारी रसायनांचा मारा.या रसायनांमुळे कॅन्सर, हृदयरोग, किडनी-लिव्हर डॅमेज, प्रजननक्षमतेवर घातक परिणाम होतात. पण भारतात ना कडक कायदे आहेत, ना प्रभावी अंमलबजावणी, ना देखरेख करणारी यंत्रणा. कारखान्यातील विषारी पाणी नद्यांत सोडण्याआधी प्रक्रिया होते की नाही, हे पाहणारा कोणीच नाही—कारण सगळे “आंधळे, बहिरे आणि मुकाट” झाले आहेत.आशिया आणि आफ्रिका हे आज जगाचे डम्पिंग यार्ड झाले आहेत. जिथे कायदे कमकुवत, तिथे विषारी उद्योगांचे स्वागत.
कोकणातील प्रसाद गावडे नावाचा युवक या सगळ्याविरोधात आवाज उठवत आहे. तो सांगतो मुंबईकडे स्थलांतर न करता, आपले जन्मगाव वाचवण्यासाठी युवकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. ही एक-दोन कंपन्यांची गोष्ट नाही; शेकडो विषारी उद्योग कोकणाच्या निसर्गावर घाला घालत आहेत.
आज कोकणात विषाचा पूर आलेला आहे.तो थांबवायचा असेल, तर शांतता नव्हे संघर्ष हवा.नाहीतर उद्या कोकण सुंदर निसर्गासाठी नव्हे, तर आजारांच्या आकडेवारीसाठी ओळखले जाईल.
