नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रावर खोल ठसा उमटवणारे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बी. एन. चव्हाण (वय ८४) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक प्राचार्य नव्हे, तर पिढ्यान्-पिढ्या वकील घडवणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व नांदेडने गमावले आहे. या निधनाने नांदेडकरांसह संपूर्ण विधी क्षेत्रात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये प्राचार्य चव्हाण यांचे योगदान अतुलनीय होते. शिक्षणाला केवळ नोकरीचे साधन न मानता, समाज घडवणारी शक्ती मानणारे ते शिक्षक होते. हजारो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनातून घडले आणि आज राज्यभर, देशभर न्यायव्यवस्थेचा कणा बनून उभे आहेत. त्यामुळेच आज अनेक वकील भावना व्यक्त करताना म्हणत आहेत – “वकील घडवणारा एक ऋषी आज हरवला.”
प्राचार्य चव्हाण हे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे चुलत बंधू, तसेच भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांचे वडील होते. बी. एन. चव्हाण यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. स्वतःच्या महाविद्यालयापुरतेच नव्हे, तर नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक उभारणीत त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरले.
ते मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड उपकेंद्राचे अनेक वर्षे संचालक होते. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीतही त्यांनी पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली. शांत, संयमी स्वभाव, शिस्तप्रिय वृत्ती आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होते.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच खासदार अशोक चव्हाण, सौ. अमिता चव्हाण, आ.जया चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. नांदेड शहरातील तसेच राज्यभरातील असंख्य वकील, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी रेखा चव्हाण, मुलगा नरेंद्र चव्हाण व मोठा परिवार आहे.
आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.आज नांदेड शहर शोकमग्न आहे…कारण ज्ञानाचा दीप विझला आहे, पण त्यांनी पेटवलेले दिवे अजूनही समाजाला उजळवत राहतील.
