गुन्हे तपासाऐवजी ‘रेटकार्ड’ तपासणी! विमानतळ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा उघडनामा
नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी तांबोळी (वय ४३) यांना तीन लाख रुपयांची लाच मागणी करून त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी तक्रारदार महिलेकडून विभागाकडे लेखी तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीनुसार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रारदार महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून महिलेच्या भावासह आई व इतरांविरुद्ध जीव मारण्याच्या धमकीचा गुन्हा (CR No. 408/2025) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, तक्रारदार महिलेच्या सासूने दिलेल्या तक्रारीवरून तक्रारदार महिलेचे वडील व आई यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा (CR No. 501/2025) दाखल झाला होता.
हे दोन्ही गुन्हे तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या तपासाचा गैरफायदा घेत, जाधव यांनी तक्रारदार महिलेच्या भावावर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी १.५ लाख रुपये आणि तक्रारदार महिलेच्या आई-वडिलांवरील गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणखी १.५ लाख रुपये, अशी एकूण ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
२३ डिसेंबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी केली असता, बरयाम सिंग नगर येथील ‘किंग कोब्रा बिअर बार’च्या मागील बाजूस असलेल्या तक्रारदार महिलेच्या वडिलांच्या घरी, शासकीय पंचांसमोर PSI गोविंद जाधव यांनी स्वतः एक लाख रुपयांची लाच स्वीकारली, तर त्यांचा सहकारी पोलीस अंमलदार वैजनाथ तांबोळी यांनी लाच देणे-घेणे यास प्रोत्साहन दिले.
सापळा कारवाईदरम्यान, आरोपी जाधव यांच्या ताब्यातून एक शासकीय रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व एक मोबाईल, तर आरोपी तांबोळी यांच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती.या संदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक करीम खान सालार खान पठाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, ही संपूर्ण सापळा कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार आणि राहुल तरकसे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
दरम्यान, विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन जबाबदार पोलीस अधिकारी लाचखोरीप्रकरणी अटकेत गेल्याने, वरिष्ठ स्तरावर हालचालींना वेग आला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्षात जमा करण्यात येतात, अशी परंपरा असल्याने, विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही नियंत्रण कक्षात पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवस पोलीस अंमलदारांना रात्री दहा वाजता हजेरी देण्याची गरज भासणार नाही, तर हजेरी नियमित वेळेतच होईल, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
