आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. किशोर इंगोले यांचे प्रतिपादन; वर्षभर चाललेल्या संविधान अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचा समारोप
नांदेड- भारतीय स्त्रियांचे मूलभूत अधिकार समानतेवर आधारित आहेत ज्यात शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभागाचा समावेश आहे, पण हुंडा, घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ आणि पितृसत्ताक विचारसरणीचे संघर्ष आजही आहेत, ज्यासाठी संविधानाने संरक्षण दिले आहे आणि कायदे आहेत, पण त्यांची अंमलबस्ती आणि सामाजिक दृष्टिकोन बदलणे हे मोठे आव्हान आहे. आजच्या काळातही आपल्या मूलभूत अधिकारांसाठी भारतीय स्रियांचा संघर्ष सुरूच असल्याचे प्रतिपादन हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. किशोर इंगोले यांनी केले. ते भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दरमहा एक अशा वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, प्रमुख अतिथी म्हणून बीपीएसएसचे प्रा. बालाजी यशवंतकर, मसापचे जिल्हाध्यक्ष बालाजी इबितदार, लसाकमचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, बालाजी थोटवे, सप्तरंगी साहित्य मंडळाच्या अलका मुगटकर, प्रज्ञाधर ढवळे, सुभाष लोखंडे, सतिश शिंदे यांची उपस्थिती होती.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय शोषित पिछडा शोषित संघटन, लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दरमहा एक अशा व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यातील समारोपीय व्याख्यानाचे आयोजन संत संताजी जगनाडे महाराज जयंती, संत गाडगेबाबा स्मृतिदिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचा समारोप करतांना भारतीय स्रियांचे मूलभूत अधिकार आणि वर्तमान संघर्ष या विषयावर बारावे पुष्प डॉ. इंगोले यांनी गुंफले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात भारतीय ह्या व्रत्तवैकल्ये, धार्मिक परंपरा आणि अंधश्रद्धेच्या खुळचट समजुतीच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. बहुसंख्य बहुजन स्रियांना आपले मूलभूत अधिकारच माहित नाहीत. आपल्या देशात पुरुषसत्ताक संस्कृती असली तरी स्रियांच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळा म्हणून स्रीच उभी आहे. भारतीय स्रियांनी फुले आंबेडकरी विचारधारेची कास धरली तरच त्या स्वतःला आणि समाजाला प्रगतीपथावर नेतील असे ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त आयोजित रंगभूमीवर चित्रकला स्पर्धेची पारितोषिके प्रमाणपत्रासह विजेत्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलका मुगटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार सतिश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिलांच्या लक्षणीय उपस्थितीसह शहरातील नामवंत विचारवंत, लेखक, चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. अल्पोपहारांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
‘लाडकी बहिण’ योजनेसारखी रेवडी संस्कृती धोकादायक
सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण ही योजना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सुरू केली. परंतु यामुळे राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तसेच रेवड्या संस्कृतीतच भरच पडली आहे. अशा योजना स्रियांच्या अधिकाराच्या चळवळीसाठी धोकादायक ठरतात. यांमुळे आपल्याच मूलभूत अधिकारांसाठीचा वर्तमान संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. रिल्स, व्यसनाधीनता, चंगळवाद आणि लहानपणापासून विवाहितेपर्यंत बाॅयफ्रेंडसारख्या चालीमुळे आधुनिकतेच्या नावावर कौटुंबिक जीवनाला तडे जात असताना लाडकी बहिणी सारख्या योजना आणि कायद्यांचा गैरवापराच्या पद्धती सामाजिक तत्वांना अपायकारक ठरत चालल्या आहेत, याकडे डॉ. किशोर इंगोले यांनी लक्ष वेधले.
