नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार आज ११ रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत समुह साधन केंद्र शेवडी बाजीराव केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ५ व्या शिक्षण परिषदेचे आयोजन दु. १२ ते ४ या वेळेत करण्यात आले आहे. केंद्र समन्वयक एस. आर. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस शिक्षक नेते तथा माजी केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर, केंद्रीय मुख्याध्यापक संदिप साखरे, जिपहा पेनूरचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, शिक्षण विषयक प्रश्नांचे अभ्यासक बालाजी थोटवे, सरपंच इंदुताई पावडे, शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती शिक्षण परिषदेच्या आयोजकांनी दिली.
शासन निर्णयानुसार राज्यभरातील प्रत्येक शाळा समुह साधन केंद्रामध्ये दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. प्रभावी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्ती आधारित वर्गप्रक्रिया प्रभावी करुन प्रत्येक मुलांपर्यंत पोहचण्यासाठी आणि गुणवत्तावृद्धी करण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरिल शारीरिक शिक्षेच्या घटना पुढे येत असून या विषयीची चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. याबरोबरच डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, त्यापुढील दिशा निर्देश, माता पालक गट आदी विविध विषयांवर सखोल चिंतन केंद्रस्तरीय सुलभकांच्या माध्यमातून होणार आहे. शिक्षण परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी मंडळीनी केले आहे.
