नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या प्रांगणात आज सकाळी एक युवक मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे २० ते २५ वयोगटातील या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृतदेहाजवळ कोणतीही ओळखपत्रे आढळली नाहीत. युवकाने जीन्स पॅन्ट परिधान केलेली होती. त्याचा एक दात तुटलेला दिसत असून उजव्या डोळ्याजवळ मार लागल्याचे चिन्ह आढळले आहे. तसेच त्याचा शर्ट ही फाटलेला असल्याने घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमके काय घडले याचा उलगडा वैद्यकीय तपासणीनंतर होणार आहे.दरम्यान, इतवारा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या युवकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे. कोणाला हा युवक ओळखीचा वाटल्यास त्वरित इतवारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
