नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाने दुसऱ्या सत्रात खो-खो स्पर्धांच्या जल्लोषाने रंगत आणली. पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या चुरशीची आणि चपळतेची दिमाखदार मांडणी पाहायला मिळाली.
खो-खो मुली गटात,
यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात झालेला सामना अतिशय रंगला. बचाव आणि आक्रमण यांचा सुंदर मेळ साधत नागपूर विद्यापीठाने तीन गुण व एक डाव राखून विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या सामन्यात कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी उत्कृष्ट समन्वय आणि गतिमान खेळाच्या जोरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा एक डाव व तीन गुणांनी पराभव करून विजय मिळविला.
खो-खो मुले गटात,
मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी तालबद्ध आणि आक्रमक खेळ सादर करत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना एक डाव व तब्बल बारा गुणांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवला.
तर दुसऱ्या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अतिशय काट्याच्या लढतीत कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यावर एक गुणांनी आणि चार मिनिट राखून विजय मिळवित पुढील फेरीत मजल मारली.

दिवसभरातील सामन्यांमुळे खो-खोप्रेमींना कौशल्य, चपळता आणि सामन्यांतील रोमांचक वळणांची अप्रतिम मेजवानी पाहायला मिळाली. पुढील दिवसांत ही रोमांचकता अधिक वाढण्याची चिन्हे असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
