खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन संपन्न;क्रीडा विभागाच्या विविध बाबींचा आढावा

नांदेड- विद्यार्थ्यानी आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत स्पष्ट ध्येय निश्चित करावे. अडचणींवर मात करून कला गुणांच्या वृद्धीसाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढवावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासह निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सव 2025-26 च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा) लातूर विभाग कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, राष्ट्रीय सेवा योजना व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, स्वारातीमचे सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. संदीप काळे, माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, डॉ. सान्वी जेठवाणी, ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्री. गील, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी सिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्दन गुपीले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आगामी ऑलिंपिकमध्ये भारताला अधिकाधिक पदके मिळवून देण्यासाठी खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा, आवश्यक ते प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. कोकाटे यांनी स्पष्ट केले. नांदेड क्रीडा संकुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयाच्या योजनांचा, उपलब्ध निधीचा, तालुका क्रीडा संकुलातील कामांचा, तसेच कोणत्या खेळांचा प्रसार अधिक आहे व कोणत्या मैदानांवर नियमित सराव केला जातो याचा सविस्तर आढावा घेतला. विविध क्रीडा संघटना व खेळाडूंच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली. सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या स्टेडियमच्या मागणीवरही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आणि कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा कला स्पर्धकांना स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा देत विभागाचे नावलौकिक वाढवावे असे आवाहन केले.

मंत्री श्री. कोकाटे म्हणाले की, चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने एखादा खेळ किंवा कला जोपासली पाहिजे. शासनाकडून खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. विविध स्पर्धांमधील मुलींचा वाढता सहभाग समाधानकारक असून अलीकडेच मुलींनी क्रिकेट वर्ल्ड कपही जिंकला आहे. निकोप समाजासाठी चांगले मार्गदर्शक व प्रशिक्षक तयार होणे आवश्यक असून मोबाईलच्या युगात सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके यांचा होत असलेला घटता कल चिंतेची बाब आहे. म्हणूनच बालवयापासूनच मुलांना कला व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ड्रॅगन बोट, रस्सीखेच, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, पॅरा ॲथलेटिक्स आणि राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुरलीधर हंबर्डे यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक बालाजी सिरसीकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!