नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज (४ डिसेंबर) अवैध वाळू उपसावर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वांगी–इंजेगाव–नागापूर–सिद्धनाथ–पुणेगाव या गावांमधील गोदावरी नदीपात्रात व नदी किनारी करण्यात आली.
इतवारा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, तसेच पोलीस पथकातील अर्जुन मुंडे, शंकर माळगे, सिरमलवार, कवठेकर, शेख जमीर, शेख आसिफ, धम्मपाल कांबळे आदी अधिकाऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संयुक्त तपासणी मोहीम राबवली.
तपासादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा मोठ्या व सहा छोट्या बोटी, पाण्यावर तरंगणारे तीन तराफे, १० ब्रास अवैध वाळू, एक इंजिन असा एकूण ₹2,27,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईसाठी पोलिस पथकही बोटीद्वारे नदीत उतरले होते. त्यांनी हायड्रोजन कटर, पेट्रोल, ड्रोनसह आवश्यक साहित्याचा वापर करून अवैध वाळू उपसा थांबविण्याची मोहीम राबवली.
या प्रकरणात पोलिस अमलदार शेख समीर यांच्या फिर्यादीवरून योगेश मस्के, देवानंद मस्के, महेश मस्के, साईनाथ मस्के (रा. नागापूर), धोंडीराम सोनटक्के (रा. ब्राह्मणवाडा), ज्ञानू पुयड,संभाजी पुयड (रा. पुणेगाव) आणि तुकाराम ठोके (रा. इंजेगाव) या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2025 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध वाळू माफियाविरुद्ध नांदेड पोलिसांची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
संबंधित व्हिडीओ ….
