शेतकरी बांधवांनो, फार्मर कपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
प्रशिक्षण, स्पर्धा आणि बक्षिसाद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण
प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण
नांदेड – शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी विविध उपक्रमांची तयारी सुरू आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत. शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असेल.
खरीप 2026 हंगामासाठी विविध पिकांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येणार असून, गटशेतीवर आधारित या उपक्रमासाठी उमेद आणि कृषी विभागाच्यावतीने तालुकास्तरावरील प्रशिक्षण अलीकडेच पूर्ण झाले आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. गत चार वर्षांपासून ही स्पर्धा राज्यातील 46 तालुक्यांमध्ये राबविण्यात येत होती. मात्र यावर्षी हा उपक्रम राज्यातील 351 तालुक्यांमध्ये विस्तारण्यात आला आहे, ही विशेष बाब आहे.
शेतकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा तसेच नोंदणीसाठी कृषी विभाग व उमेद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
