आई – पुत्रावर गुन्हा: राजकारणाचा बदला की लोकशाहीवर हमला?  

राजकारणाचा ‘बॅडमिंटन’: न्यायव्यवस्था कोर्टात की कोर्टाबाहेर?  

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा न्यायाचा नव्हे तर राजकारणाचा उघड खेळ आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची एकजूट मोडण्यासाठी हा डाव रचला गेला, हे उघड आहे.

राहुल गांधी,ज्यांच्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले. त्यांच्यावर आज इतका द्वेष ओतला जातोय, जितका सुसंस्कृत लोकशाहीत कधीच पाहायला मिळत नाही. ज्यांनी भारतात संगणकक्रांती आणली, त्यांच्यावर तेव्हा टीका झाली; आणि आज त्या तंत्रज्ञानाच्या जोरावरच लोकशाहीला राजशाहीत किंवा हुकूमशाहीत ढकलण्याचा उद्योग सुरू आहे.

इंदिरा गांधींना त्यांच्या घरात गोळ्या घालून मारण्यात आले देशासाठी. आज भारतात रशिया आणि चीन सारख्या  हत्या नसतील, पण राजकीय हत्या करण्याचे सर्व डावपेच वापरले जात आहेत. आम्ही आधीच लिहिले होते,  भारत चीन आणि रशियाच्या वाटेवर चाललाय. तिथे विरोधकांना संपवतात; येथे त्यांच्या कारकिर्दीला गळा घालण्यासाठी नवनवीन खेळ सुरू आहेत.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळणे,ही फक्त खेळाची नव्हे तर न्यायव्यवस्थेतील धोकादायक जवळीक सांगणारी घंटा आहे. न्यायमूर्तींच्या नियुक्त्या सरकारच्या कमिटीने कराव्यात ही त्यांची भूमिका हीच चिंता मजबूत करते. हा कायदा 2015 मध्येच रद्दबातल झाला होता, तरीही आज तेच विचार सूर काढले जातात. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर आधीच अनेक आरोप असताना त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती,लोकशाहीच्या आरशात काळे डाग आहे.

आता या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर दाखल झालेला गुन्हा म्हणजे केवळ एसआयआरविरुद्धच्या जनआक्रोशातून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भोंगळ प्रयत्न. आधी हेरॉल्ड प्रकरणी अनेक तास तपासणी करून काहीच सापडले नाही; मग अचानक हा गुन्हा का? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरचे आरोप झाकण्यासाठी हे नवे प्रकरण उभे केले का?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येणार आहेत आणि त्यांच्याप्रमाणे लोकशाहीला मुठीत पकडण्याचा प्रयत्न इथेही सुरू आहे का? तसे असेल तर देशाने याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये एसआयआरच्या कामामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना कुटुंबीयांनी सांगितल्या आहेत. भाजप नेते तेथे ज्ञानेश कुमार यांना ‘जमिनीवर उतरून बघा काय चाललंय’ असे म्हणतात,कारण तिथे त्यांचे सरकार नाही. ममता बॅनर्जींच्या राज्यातील टीमच एसआयआरचे काम पाहते आणि भाजपच्या मनासारखा निकाल मिळत नाही म्हणून तेच आता दोषी ठरतात. विरोधाभास इतका उघडा की लपवण्याचा प्रश्न नाही.

एकूण चित्र काळोखाचे आहे. आज सुरू होणाऱ्या लोकसभेत विरोधक कोणती नवी रणनीती आणतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गांधी कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने विरोधक एकत्र येतात की नाही हे अधिवेशनच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!