नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस उप महा निरीक्षक कार्यालयासमोर एका हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात आज सकाळी सुमारे दहा वाजता घडला.
प्राप्त माहितीनुसार, प्रणव आचार्य हे चार वर्षीय बालक आपल्या आजोबांसोबत रस्त्याने जात असताना, एका हायवा वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी आजोबांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरातील नागरिक रोशात आले आणि काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.या प्रकरणी अधिक माहिती देताना नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी सांगितले की, “ही हायवा गाडी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जात होती. गाडीचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”

दरम्यान, समृद्धी महामार्गावरही बिना नंबरच्या वाहनांचा वापर होत असल्याची बाब या घटने नंतर चर्चेला आली आहे, अशा वाहनांवर कोण नियंत्रण ठेवते, तपासणी कोण करते यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
