लिंबगाव शिवारात खून करणाऱ्यास आठ वर्षाची सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगावजवळच्या रेल्वे रुळांवरील पुलावर एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन खुन करणाऱ्यास दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी आठ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील मारेकरी मध्यप्रदेश मधून मजुरी करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता.
राहुल धारु इंगोले यांनी दिलेल्यातक्रारीनुसार 11 फेबु्रवारी 2020 रोजी अविनाश बबन इंगोले (25) यांना पुण्याला जायचे होते. म्हणून त्यांना नाळेश्र्वर येथून दुचाकीवर घेवून दोघे जण आलो. पण लिंबगाव रेल्वे स्थानकावरील गाडी उशीरा येणार होती म्हणून त्यांना पुढे नाळेश्र्वर चौकात सोडण्यासाठी जात असतांना लिंबगाव जवळील रेल्वे रुळांवर असलेल्या पुलाजवळ नांदेडकडून एक ट्रॅव्हल्स गाडी आली आणि त्या गाडीला आम्ही हात दाखवला. ती गाडी थांबली आणि अविनाश बबन इंगोले हे गाडीत बसत असतांना तेथे रुळावर थांबलेल्या एका व्यक्तीला त्यांनी विचारले तु विनाकारण गाड्या थांबवतो आहेस लोकांनी तुला मारले आहे असे का करत आहेस. तेंव्हा त्या व्यक्तीने अविनाशच्या डोक्यातच दगडाने मारले. पुढे पोलीस आले त्यांनी त्या माणसाला जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले. त्याचे नाव काळूराम दिलदार जाटव (30) रा.खिरीया ता.गाढरवारा जि.नरसींहपुर(मध्यप्रदेश) असे आहे. सोबतच जखमी अवस्थेतील अविनाश इंगोले यांच्यावर सुध्दा उपचार सुरू होता. पण उपचारा दरम्यान 12 फेबु्रवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या संदर्भाने लिंबगाव पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 81/2020 दाखल केला. पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार प्रकाश पेद्देवाड यांनी संपुर्ण तपास करून काळूराम जाटव विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी आठ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी युक्तीवाद करतांना घटना सिध्द झाली आहे. त्यामुळे जाटवला शिक्षा द्यावी अशी विनंती केली.  युक्तीवाद ऐकल्यावर न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी काळूराम जाटवला आठ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. तो अटक झाला तेंव्हापासून निकाल लागेपर्यंत तुरूंगातच आहे. याप्रकरणात लिंबगावचे पोलीस अंमलदार निवृत्ती रामबैनवाड यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!