मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध
नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांप्रती असलेल्या आदरपूर्वक भावना याचा संगम म्हणजेच २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेली १८ वर्ष सादर होत असलेला सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम काल कुसूम सभागृहात उत्तरोत्तर रंगला.देशभक्तीपर विविध रचना व नृत्य सादर करुन महाराष्ट्रातील विविध कलावंतांनी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन देशभक्तीची भावना वृध्दींगत केली.
नांदेड जिल्हा पोलीस दल आणि संवाद यांच्या वतीने पत्रकार विजय जोशी यांच्या पुढाकरातून गेल्या १७ वर्षापासून सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गितांचा ५८ वा प्रयोग नांदेडच्या कुसूम सभागृहात काल सायंकाळी पार पडला. दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तर उद्घाटक म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आणि शहाजी उमाप यांनी सातत्याने सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतूक करुन अत्याधुनिक शस्त्रे असतानाही आपल्या सैनिकांनी, पोलिसांनी व शूर जवानांनी ज्या हिमतीने अतिरेक्यांचा सामना केला हि अभिमानाची गोष्ट आहे. सलग दोन दिवस मुंबई अतिरेक्याच्या कचाट्यात अडकली असताना आपल्या जवानांनी त्या अतिरेक्यांना देशोधडीला लावून अनोखी कामगिरी केली. भारतीय सैन्याची काय ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले.
यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या आणि नांदेडच्या कलावंतांनी वेगवेगळी देशभक्तीपर गिते सादर करुन तसेच मुंबईचा अतिरेकी हल्ला यावरील जिवंत देखावा सादर करुन कलावंतांनी नांदेडकरांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन डॉ.सौ.वैशाली गोस्वामी यांनी केले तर छत्रपती संभाजीनगरच्या सरला शिंदे, गौरव पवार, राहुल वाव्हुळे, तर नांदेडच्या श्रीरंग चिंतेवार आणि पौर्णिमा कांबळे यांनी देशभक्तीच्या रचना सादर करुन नांदेडकरांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अॅड.गजानन पिंपरखेडे व बापू दासरी यांचे होते. तर संगीतसाथ छत्रपती संभाजीनगरच्या राजू जगधने, राजेश भावसार, अभिजित शिंदे, गणेश चव्हाण यांनी केली.
नव्या उमेदीच्या मराठवाड्यातील प्रथित यश व्हायोलिन वादक डॉ.गुंजन शिरभाते हिने सागरा प्राण तळमळला हे गित व्हायोलिनवर सादर करुन रसिकांची मने जिंकली. नृत्यात आरती क्रिऐशनच्या कलावंतांनी देशभक्तीपर विविध गाण्यांवर जोशपूर्ण नृत्य सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. सैनिक हो तुमच्यासाठी, जहाँ डाल डाल कर, ये मेरे वतन के लोगो, देश मेरा रंगिला, जलवा जलवा, यह देश है विर जवानों का आदी विविध गिते प्रथित यश गायकांनी सादर केले. विजय जोशी यांच्या पुढाकरातून सादर करण्यात आलेले मेलडी रसिकांना भारावून गेली. म्यानातून उसळे, शूर आम्ही सरदार, जयोस्तुते आणि गर्जा महाराष्ट्र माझा हि चार गाणी सलग सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे उद्घाटकीय सूत्रसंचलन बापू दासरी यांनी केले तर प्रास्ताविक अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रकाश कस्तुरे ज्यांनी ३२ वर्ष सैन्य दलात सेवा दिली. आणि तीन लढायामध्ये सहभाग नोंदवला. ज्यात श्रीलंका आणि कारगील युध्दात सहभाग नोंदवला. त्यांनी सैनिकांचे महत्व समजावून सांगून अग्निवीरबद्दल माहिती दिली.
