संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन  

नांदेड – भारतीय संविधान 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सव ” घर घर संविधान या कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत समिती कार्यालयात विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. समिती कार्यालयात दररोज कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी तसेच अर्जदार, पालक यांच्या उपस्थितीत त्यांना संविधानाचे वाचन, भारतीय संविधानाचे महत्व याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या वर्षातील विविध व्यावसायिक पाठयक्रमामध्ये राखीव प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी समितीकडून विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जातवैधता प्रमाणपत्र मिळवितांना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत अर्जदार व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.

ज्या जाती दावा प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत अशा प्रकरणांमध्ये प्राधान्याने अर्जदार यांना एसएमएस व ईमेलद्वारे कळवून त्यांच्याकडून समिती कार्यालयात त्रुटीची पुर्तता करुन तात्काळ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

समितीस्तरावर विशेष सुनावणी आयोजित करुन देखील जाती दावा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार आहेत. तेंव्हा 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत समितीमार्फत आयोजित केलेल्या सदर विशेष मोहिम शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदार, पालकांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!