सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धेला रसिकांचा भरघोस प्रतिसाद
नांदेड -सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2025 – 2026 च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर शिवशंभो वीज प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने प्रमोद देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘मीना’ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे झालेल्या या प्रयोगाला हाउसफुल चा बोर्ड लागला.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये काम करणाऱ्या लाईनमन इंजिनियर ऑपरेटर कंत्राटी कामगार अतांत्रिक कामगार वीज ग्राहक यांच्या जीवन संघर्षाची ही कहाणी अतिशय दमदार पणे सादर करण्यात आली.
प्रेक्षकांची मीना बद्दल असलेली उत्कंठा शेवटच्या दृश्य पर्यंत ताणून धरण्यात हे नाटक यशस्वी झाले.
महावितरणच्या कावडपूर शाखेत नव्यानेच रुजू झालेले अभियंता श्री डोकळे हे शाखा कार्यालयाची एकूण झाडाझडती घेत कामावर क्ष द्यायला सुरुवात करतात परंतु कार्यालयात कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने त्यांना वारंवार अडचणीचा सामना करावा लागतो हे त्यांना येणाऱ्या अनेक फोन कॉल्स वरून समजते. अशातच तक्रारीवर बदली झालेला नाटकाचा नायक राजू (प्रमोद देशमुख), झोन बदलीवर आलेली नाटकाची नायिका रश्मी (स्वाती लांडगे ) यांच्यामुळे तेथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या अस्तित्वावर घाला येतो आणि सुरवसे (निवृत्ती जाधव) हे हवालदिल होतात. एक ग्राहक आपल्या वीज बिलाची तक्रार घेऊन कार्यालयात येतात आणि त्यांना आलेल्या चुकीच्या वीजबिल्याबद्दल अभियंता यांना जाब विचारतात आणि प्रेक्षकांसमोर काही प्रश्न ठेवतात त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन नाटकाचा नायक राजू त्यांना देतो आणि या त्याच्या सकारात्मक वागणुकीवर भाळून रश्मी राजू कडे आपसूकच आकर्षित होते आणि त्यांच्यात एक हळुवार प्रेम सुरू होते तर दुसऱ्या बाजूला राजूच्या येण्यामुळे सुरवसेंना निर्माण झालेला धोका सुरवसे च्या मनावर बिंबवण्यात लाईनमन जाधव (महेश स्वामी) आणि अन्नमवार (श्रीराम ढगे) जवळपास यशस्वी होतात आणि त्याची जागा राखण्यासाठी एक जागा रिकामी करावी लागेल असे सुचवतात.
महावितरण किंवा त्यांचा लाईनमन यांची एकच बाजू नेहमी समाजासमोर आली आहे परंतु त्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेखक दिग्दर्शक प्रमोद देशमुख यांनी केला आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती असेल तर मग यातलं मरण साधं कसं, आमचंही मरण राष्ट्रसाठी सीमेवर जणू शहिदाचं जसं , असं सांगून दिला का कधी आम्हाला शहिदाचा दर्जा असा प्रश्न नाटकाचा नायक राजू विचारतो. वस्तुस्थितीला धरून अतिशय रंजकपणे हा विषय दिग्दर्शकाने हाताळला आहे. नानाचा पंटर (ऋषिकेश कदम) उभा करण्यात ऋषिकेश कदम यशस्वी झाले आहेत तर साथीदाराच्या भूमिकेत योगीराज तिडके, गंगाधर खंदारे यांनीही उत्तम साथ दिली आहे. ग्राहकाची भूमिका शिवकुमार मठवाले यांनी तर इन्स्पेक्टर ची भूमिका पंडित तेलंग यांनी अतिशय दमदारपणे निभावली आहे. अभियंता डोकळे यांच्या भूमिकेला राजकुमार सिंदगीकर यांनी न्याय दिला आहे. महावितरण च्या शाखा कार्यालयाचे नेपथ्य, शाखा कार्यालयात असलेले जुने पुराने कपाट, त्यावर अडकवलेले फ्युज वायर, मीटर काढून आणल्यानंतर उरलेली टपर, कार्यालयात असलेलं बाकडं बाहेर आवारात पडलेले आकोडे, शाखा कार्यालयाच्या आवारात असलेली कर्मचाऱ्यांसाठी ची बसण्याची जागा तसेच नदीचा किनारा, हे अश्विनी देशमुख यांनी केलेले नेपथ्य अत्यंत सुसंगत आणि नेमकेपणा सांगत होत.
नाटकाला अनुरूप असे संगीत देण्यात पद्मजा देशमुख यशस्वी झाले आहे. नाटकातील विविध स्थळे दाखविताना नदीचा किनारा आणि प्रेमाच्या कबुलीसाठी गायलेले गाणे तू मेरा जानू है ही सगळीच प्रकाशयोजना सुरेखा सिंदगीकर यांनी नेमकेपणाने केली तर रंगभूषा वेशभूषा क्रांती पंडित तेलंग यांनी केली.
लेखनातील दमदारपणा दिग्दर्शनातील अचूकता आणि नवख्या असणाऱ्या सर्व कलाकारांनी केलेला सहज अभिनय यामुळे हे नाटक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहे.
आज सायंकाळी ७ वा. स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड द्वारा निर्मित, दिनेश कवडे लिखित व द्वारा दिग्दर्शित ‘ स्वप्नपंख’ हे नाटक सादर होणार आहे. नाममात्र रु. १५ व रु. १० मध्ये तिकीट दर असलेली ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
