नांदेड (प्रतिनिधी)-शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या एका नराधम शिक्षकाला सात वर्षांच्या बालिकेवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी (२४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत) सुनावली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी हा आदेश दिला.
१९ नोव्हेंबरच्या रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी सात वर्षीय बालिका घरी परतली तेव्हा तिच्या वागण्यात आईला स्पष्टपणे असामान्य बदल जाणवला. आईने चौकशी केल्यानंतर मुलीने शाळेतील शिक्षक ईशान सुकुमार कासार लोखंडे (वय ३६) याने तिच्यावर केलेल्या अत्याचाराची संपूर्ण माहिती रडत–रडत सांगितली.या धक्कादायक खुलाशानंतर पीडितेच्या आईने भाग्यनगर पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शिक्षक ईशान लोखंडेविरुद्ध गुन्हा क्रमांक 614/2025 नोंदवला आहे.या गुन्ह्यात, भारतीय न्यायसंहिता कलम 64(2)(f), 652, 351(2) तसेच पोक्सो कायद्याची कलमे 4, 6 आणि 8 लावण्यात आली आहेत.तपासाचे काम सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहे.
आज दुपारी एपीआय अनुपमा केंद्रे आणि पथकाने आरोपी लोखंडे याला विशेष न्यायालयात हजर केले.न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील ऍड. मोहम्मद अब्बास यांनी:
- घटनेची गंभीरता,
- अल्पवयीन पीडितेची अवस्था,
- पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक चौकशी
या सर्वांचा दाखला देत आरोपीला पोलीस कोठडी का आवश्यक आहे, याचे सविस्तर विवेचन केले.प्रकरणातील भीषणता आणि तपासाची गरज लक्षात घेता न्यायालयाने आरोपी शिक्षकाला २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
