नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण परिसरात 10 नोव्हेंबर रोजी गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुलगुरू निवासाच्या मागील तळ्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलगी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती, मात्र परत न आल्याने ही तक्रार नोंदवण्यात आली.
मृतदेह सापडल्यानंतर पूरक जबाब
18 नोव्हेंबर रोजी मुलीच्या आईने दिलेल्या पुरवणी जबाबात तिने मुलगी आणि संदीप नानाराव गिरडे (वय 30) यांच्यात परिचय असल्याचे सांगितले. दहा नोव्हेंबर रोजी संदीपने अल्पवयीन मुलीला दवाखान्यात बोलावले होते, परंतु ती गेली नाही. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याच कारणावरून मुलीने तळ्यात उडी मारून जीव दिल्याचा संशय आईने व्यक्त केला आहे.
गुन्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ऍट्रॉसिटी कलमांची भर
मुलगी अनुसूचित जातीची असल्याने प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ऍट्रॉसिटी कायद्याची तरतूद लागू करण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली. तपासादरम्यान आरोपी संदीप गिरडे यास अटक करण्यात आली.
न्यायालयात आरोपीची कोठडी
आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली असता, आरोपीच्या वकिलांनी “आरोपी अनेक दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होता, अटकेची माहिती आम्हाला देण्यात आली नाही,” असा दावा करत जामिनाची मागणी केली.
सरकारी वकिलांचा प्रतिवाद
सहाय्यक सरकारी वकील ऍड.एम. ए. बतुल्ला (डांगे) यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीच्या अटकेबाबतची माहिती नातलग बालाजी कोरडे यांना फोनवर तसेच प्रत्यक्ष देण्यात आली होती. तथापि, त्यांनी अटक फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. याचदरम्यान कोरडे न्यायालयातून हळूच बाहेर पडल्याचेही न्यायालयाने नोंदवले.सर्व बाजूंचा विचार करून पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी संदीप गिरडे यास 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
