कंत्राटी कामगारांचे मनपा कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)-बोनस वाटपातील भेदभाव व बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा न.पा.,मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने काल दि.17 पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण आणि बोंब मारो आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील सफाई, ड्रेनेज, पाणीपुरवठा कामगारांना बोनस वाटप करतांना प्रशासनाने भेदभाव केलेला आहे. 730 कामगारांना बोनस वाटप केले परंतु त्यात 50-60 लोकांना जाणिवपूर्वक बोनस पासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत सफाई क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्वसुचना न देता व कुठलाही दोष नसतांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. या संदर्भात कंत्राटदार व महापालिका प्रशासनाकडे आयटक प्रणित मराठवाडा न.पा.,मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु प्रशासनाने केवळ वेळ काढू धोरण अवलंबिल्याने संघटनेच्यावतीने सोमवार दि.17 नोव्हेंबर पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण व बोंब मारो आंदोलन सुरु करण्यात आले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्णय कामगार व संघटनेने घेतला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.भगवान नाईक हे करीत आहेत. तर आंदोलनात पाणीपुरवठा, ड्रेनेज, सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!