नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदावर मोठ्या बहुमताने विजय मिळवत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. तर क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय राहून राज्यातील अनेक खेळाडूंना घडविणारे आणि नांदेडच्या क्रीडा क्षेत्रातील परिचित नाव असलेले विक्रांत खेडकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. या नूतन कार्यकारिणीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे नांदेडच्या क्रीडा क्षेत्रात आणि राज्यातील बॉक्सिंग प्रेमींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
ही निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धर्मादाय आयुक्तालयाचे अधिकारी राहुल चव्हाण यांच्या देखरेखीखाली पार पडली. दरेकर कवळी पॅनलने उत्कृष्ट संघटनेचे प्रदर्शन करत मोठ्या बहुमताने या निवडणुकीत विजय मिळविला. एकूण 60 सदस्यांपैकी 43 सदस्यांनी मतदान केले असून मतदानाची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडली — पहिल्या टप्प्यात 15, दुसऱ्या टप्प्यात 15 आणि तिसऱ्या टप्प्यात 13 अशा पद्धतीने मतमोजणी करण्यात आली. यात 43 पैकी 41 अशा प्रचंड बहुमताने दरेकर कवळी पॅनलने विजय मिळविला.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात आनंद आणि अभिमान व्यक्त होत आहे. गेल्या तीन दशकांपासून ते क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी अखंड केले आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवा बॉक्सरना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्या नेतृत्वाकडून नवचैतन्याची अपेक्षा
क्रीडा विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या या नव्या नेतृत्वामुळे राज्यात बॉक्सिंग या खेळाला नवचैतन्य मिळेल. संघटनेत व्यावसायिकता, पारदर्शकता आणि दीर्घकालीन विकास धोरणाला चालना मिळणार आहे. मागील काही वर्षांपासून राज्यात बॉक्सिंग क्षेत्रात पडलेली मरगळ आता दूर होण्याची शक्यता आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्यभरात ग्रामीण भागातील मुला-मुलींपर्यंत या खेळाचा प्रसार करण्याचा निर्धार या कार्यकारिणीने दर्शविला आहे.
राज्यातील अनेक बॉक्सिंग प्रशिक्षक, संघटक आणि खेळाडूंचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यात बॉक्सिंगचा ‘सुवर्णकाळ’ सुरू होईल. जिल्हास्तरावरून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बॉक्सिंगचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष धोरण आखले जाईल. बॉक्सिंगसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे, आर्थिक सहाय्य योजना, स्पर्धांचे नियमित आयोजन आणि महिला खेळाडूंना अधिक संधी मिळवून देण्यावर या नव्या संघटनेचा भर असेल. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दरेकर कवळी पॅनलचा विजय निर्णायक ठरला. महाराष्ट्रात बॉक्सिंग या खेळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी निवडणुकीपूर्वीच व्यापक नियोजन आखले होते. त्यात त्यांनी “बॉक्सिंगला ग्रामीण ते शहरी सर्व स्तरावर नेऊन प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग हब निर्माण करणे” हे ध्येय ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन नवी दिशा घेईल, असा विश्वास क्रीडा जगतात व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची नव्याने निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे –
विभागीय सचिव: अरुण भोसले, मयूर बोरसे, साळुंखे विजयकुमार यादव व विजय गोटे
या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रात बॉक्सिंगला नवी उंची मिळेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे. “राज्य सरकारकडून सहकार्य, तसेच असोसिएशनकडून धोरणात्मक प्रयत्न झाले, तर महाराष्ट्रातून ऑलिंपिक दर्जाचे बॉक्सर घडतील,” असे मत अनेक क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग रिंग, प्रशिक्षण शिबिरे, कोचिंग अकादमी आणि महिला खेळाडूंसाठी विशेष योजना सुरू करण्याची शक्यता या नव्या कार्यकारिणीमुळे वाढली आहे. महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्र नव्या जोमाने पुढे सरसावेल आणि देशाला उत्कृष्ट खेळाडू देईल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.