नांदेड- जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, अपंग मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधांची पाहणी केली.
लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय, टिंगरी गल्ली येथील मतदान केंद्र व इंदिरानगर येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय येथे असलेल्या 5/1 मतदान केंद्र व कै. विश्वनाथ नळगे माध्यमिक महाविद्यालय जुनी इंदिरानगर येथील खोली क्रमांक 2 व 3 येथील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
मतमोजणी कक्षातील पाहणी करुन निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान यंत्राच्या एफएलसी प्रक्रीयेची पाहणी करुन निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दक्ष व पारदर्शक राहून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व लोहा तहसिलदार श्री. परळीकर, निवडणूक शाखेचे अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा नांदेड रोडवरील एसएसटी पथकास भेट देऊन पाहणी केली. निवडणूक काळात अनधिकृत वाहतूक, रोख रक्कम, दारू, भेटवस्तू आदींची देवाणघेवाण रोखण्यासाठी सतत गस्त आणि तपासणी सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकांना दिले.
